राज ठाकरेंवरील वक्तव्यावर मनसेचे शहराध्यक्ष हर्षद पाटील आक्रमक; अनाठायी वक्तव्ये खपवून न घेण्याचा इशारा
डोंबिवली : मनसेचे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी भाजपचे स्थानिक नेते नंदू परब यांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. “राज ठाकरे यांच्यावर बोलण्याची तुमची औकात नाही,” अशा शब्दांत हर्षद पाटील यांनी नंदू परब यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांच्याबाबत नंदू परब यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच हर्षद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी राजकीय योगदान तपासा
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपली राजकीय उंची आणि योगदान तपासावे, असा टोला हर्षद पाटील यांनी नंदू परब यांना लगावला. राज ठाकरेंबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनाठायी वक्तव्ये खपवून घेणार नाही
“राज ठाकरे यांच्यावर बोलण्याची तुमची औकात नाही. मनसेच्या नेतृत्वाबाबत अथवा राज ठाकरे यांच्याबाबत अनाठायी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,” असा इशाराही हर्षद पाटील यांनी दिला.
कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
नंदू परब यांच्या विधानाला हर्षद पाटील यांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे कल्याण-डोंबिवलीतील मनसे आणि भाजपमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या वक्तव्यावरून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.






