एनजीटी स्कूलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी; विविध प्राथमिक तपासण्या व औषधे मोफत
उल्हासनगर : रायगड हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने उल्हासनगर-४ येथील एनजीटी स्कूलमध्ये बुधवार, २६ ऑगस्ट रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
शिबिरात जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोग, नेत्ररोग, अस्थिरोग तसेच कान-नाक-घसा (ENT) विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. प्रशिक्षित नर्सिंग स्टाफमार्फत रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, नाडी आणि SpO₂ यांसारख्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या.
औषधे आणि एक्स-रे तपासणीची सुविधा
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या रुग्णांना औषधे मोफत देण्यात आली. तसेच मोबाईल X-Ray व्हॅनच्या माध्यमातून Chest X-Ray आणि Upper Limb X-Ray या तपासण्यांची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
महाआरोग्य शिबिरासाठी डॉ. धनश्री धनंजय बोडारे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आरोग्य तपासणीसह शिबिरातील उपलब्ध सुविधांचा लाभ घेतला.





