नागरिकांसाठी विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण विकसित करण्यावर भर; उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना
मुंब्रा : मुंब्रा रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, नागरिकांना किनाऱ्यावर फिरता यावे, कुटुंबासमवेत वेळ घालवता यावा तसेच विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने चौपाटीचा विकास करण्यात येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली.
उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना
पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उर्वरित कामेही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांना दिल्या. चौपाटीचा विकास पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉलचा आनंद
प्रकल्पाच्या पाहणीवेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचाही आनंद घेतला. यावेळी स्थानिक नागरिक आणि खेळाडूंशीही त्यांनी संवाद साधला.
पदाधिकारी उपस्थित
यावेळी खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, माजी नगरसेवक बालाजी काकडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चौपाटीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंब्रा परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.






