ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पावसाळ्यात रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश देण्यात आले.
विसर्जन व मिरवणूक मार्गांची पाहणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रमुख शहरांतील रस्ते व गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. विसर्जन मार्ग, मिरवणुकीचे प्रमुख मार्ग आणि विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कोणतेही खड्डे राहू नयेत, यासाठी तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
२४ तास यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करून रस्त्यांची नियमित पाहणी करावी, खड्ड्यांच्या तक्रारींसाठी फोन क्रमांक जाहीर करावेत तसेच ॲपद्वारे प्राप्त तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, असे शिंदे यांनी सांगितले. रस्ते दुरुस्तीसाठी २४ तास यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच आयुक्तांनी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामांची पाहणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
विविध यंत्रणांमध्ये समन्वय
सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, पीएमआरडीए यांसह अन्य यंत्रणांनी आपापल्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी. संबंधित यंत्रणेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्यास स्थानिक महानगरपालिकेने आपल्या खर्चाने दुरुस्ती करून तो खर्च संबंधित यंत्रणेकडून वसूल करावा, असे निर्देशही देण्यात आले.
नवीन खोदकामांना तूर्तास मनाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देताना नवीन खड्डे निर्माण होतील अशा प्रकारच्या खोदकामांना परवानगी देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले. मिरवणूक व विसर्जन मार्गावरील विद्युत तारांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव मंडळांकडून अनावश्यक शुल्क आकारले जाऊ नये आणि परवानगीची प्रक्रिया सुलभ ठेवावी, असेही सांगण्यात आले.
उत्कृष्ट मनपांना विशेष पुरस्कार
खड्डेमुक्त, सर्व सोयीसुविधांनी युक्त आणि दुर्घटनामुक्त गणेशोत्सवासाठी चांगले काम करणाऱ्या महानगरपालिकांना नगरविकास विभागाच्या माध्यमातून पहिले, दुसरे आणि तिसरे असे विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. कामगिरी खराब असलेल्या महानगरपालिका व अधिकाऱ्यांचीही शासनाकडून नोंद घेतली जाईल आणि भविष्यात निधी देताना त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह एमएमआर क्षेत्रातील तसेच राज्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते. गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.






