रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट, पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
१४ विभागांचा कृती आराखडा
चाकण-तळेगाव परिसरातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे तसेच दर शुक्रवारी आढावा बैठक घेऊन कामांना गती द्यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
रस्ते दुरुस्तीला प्राधान्य
चाकण औद्योगिक क्षेत्रातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांच्या कडेला असलेले खड्डे बुजविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपुलांचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
पायाभूत सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा
मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या परस्परांशी निगडित सुविधांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. चाकण शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विकास आराखडा लवकरच मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
वीज, पोलीस व अग्निशमन सुविधांसाठी जागा
वीजेची समस्या सोडविण्यासाठी महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि रुग्णालयांसाठीही एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
औद्योगिक विकासाला चालना मिळणार
छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तसेच उरण, कर्जत, राजगुरुनगर, शिरूर आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
चाकण-तळेगावसारख्या औद्योगिक पट्ट्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या समस्येतून उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.






