३५ वर्षांच्या संघर्षानंतर भूमिपुत्रांना १३८.४५ कोटींचा मोबदला; रखडलेल्या कामाला मिळणार वेग
कल्याण : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी स्थानिक भूमिपुत्रांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला आहे.
भूमिपुत्रांना मोबदला पत्रांचे वाटप
मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते प्रकल्पबाधित भूमिपुत्रांना मोबदला पत्रे देण्यात आली. यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, महापौर हर्षदा चौधरी, गोपाळ लांडगे यांच्यासह जमीनमालक उपस्थित होते.
३५ वर्षांचा प्रश्न मार्गी
कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू असले तरी भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्याने काही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला होता. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याचे काम रखडले होते. या प्रश्नामुळे काटई नाका, पलावा चौक आणि शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली होती.
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
प्रकल्पबाधित भूमिपुत्रांच्या प्रश्नाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दखल घेत शासन आणि संबंधित विभागांसोबत बैठका घेतल्या. आमदार राजेश मोरे यांनीही प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांनंतर प्रशासनाने १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यास मंजुरी दिली असून, उर्वरित टप्प्यातील मोबदला लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा
भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्याने कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रखडलेल्या सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग येण्याची अपेक्षा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरहून ठाणे, नवी मुंबई व मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मेट्रो १२ आणि मेट्रो १२-अच्या कामांनाही यामुळे मदत होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागल्याने भूमिपुत्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






