जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांची घोषणा; पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल

डोंबिवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी या नियुक्तीची घोषणा केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि जिल्हा निरीक्षक सुरेशदादा बारसिंग यांच्या मंजुरीने ही नियुक्ती करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
शहराध्यक्ष पदासाठी होती चुरस
माजी शहराध्यक्ष किशोर मगरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन शहराध्यक्ष कोण होणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह डोंबिवलीकरांचे लक्ष लागले होते. मागील दोन वर्षांपासून या पदासाठी पक्षांतर्गत मोठी चुरस असल्याची चर्चा होती. अखेर ॲड. अंभोरे यांच्या नियुक्तीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
१५ वर्षांपासून रिपाइं परिवाराशी जोडले
ॲड. सुभाष अंभोरे हे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाचे संचालक आहेत. समाजहित न्यूज चॅनल व डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संपादक म्हणूनही ते कार्यरत आहेत. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील १५ वर्षांपासून ते रिपब्लिकन परिवाराशी जोडलेले आहेत.
सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग
दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ॲड. अंभोरे यांनी डोंबिवली शहर उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे पक्षाचे काम केले. विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य आणि अभ्यासू नेतृत्वाची दखल घेत प्रल्हाद जाधव यांनी यापूर्वी त्यांची डोंबिवली शहर युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
कामगिरीनंतर मोठी जबाबदारी
युवा अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर काही महिन्यांतच ॲड. अंभोरे यांच्यावर पक्षाच्या डोंबिवली शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहराध्यक्षपद हे आव्हानात्मक असून ॲड. अंभोरे हे या पदासाठी सक्षम पर्याय असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी व्यक्त केला.
ॲड. सुभाष अंभोरे यांच्या नियुक्तीबद्दल डोंबिवली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला शहरात अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






