सर्पमित्र ऋषी यांच्या तत्परतेने सापाला पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा परिसरातील पाणीपुरी कारखान्याजवळील जानू स्मृती चाळ क्रमांक दोन येथे साप आढळल्याने रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. साप दिसताच रहिवाशांनी तात्काळ सर्पमित्र ऋषी यांना माहिती दिली.
घोणस जातीचा साप आढळला
माहिती मिळताच सर्पमित्र ऋषी घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांनी साप ज्या ठिकाणी दिसल्याचे सांगितले, त्या परिसराची पाहणी केली असता घोणस जातीचा साप असल्याचे निदर्शनास आले.
सर्पमित्राच्या तत्परतेने साप सुरक्षित

सर्पमित्र ऋषी यांनी सुरक्षितपणे सापाला पकडले. त्यानंतर सापाची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पावसाळ्यात रहिवासी भागात साप आढळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्याला हाताळण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्रांची किंवा संबंधित यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.






