‘नरसेवा नारायण पूजा’चा आदर्श; संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : “नरसेवा नारायण पूजा” ही शिकवण प्रत्यक्ष कृतीतून साकारत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने कल्याण येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २६६ निरंकारी भक्तांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. यामध्ये १८७ पुरुष आणि ७९ महिला रक्तदात्यांचा समावेश होता.
संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोनअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, रामनगरी, कल्याण पूर्व येथे रविवारी हे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. संकल्प रक्तपेढी, कल्याण यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवता आणि सेवाभावाच्या शिकवणीचा अंगीकार करत निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. शिबिराचा शुभारंभ मिशनच्या कल्याण विभागाचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत निरंकार प्रभूचे ध्यान आणि सतगुरुंच्या जयघोषाने करण्यात आला.
या उपक्रमाला स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोईर, समाजसेवक कैलास भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी आणि समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.
सेक्टर संयोजकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल युनिट आणि स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत २६६ भक्तांनी जीवनदानाच्या या सेवायज्ञात मोलाचे योगदान दिले.






