सुमारे १०० बाऊन्सरसह हल्ला केल्याचा बिल्डरवर आरोप; गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची जोरदार मागणी
डोंबिवली : सोनारपाडा परिसरात राहणारे अभिलाष ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रामेश्वर बिल्डरचे रामेश्वर प्रसाद बिदेसर गुप्ता यांनी सुमारे १०० बाऊन्सरसह येऊन हा हल्ला केल्याचा आरोप ठाकूर कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेत महिला व पुरुष जखमी झाले असून, एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर अभिलाष ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रार घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेची माहिती परिसरात पसरताच सोनारपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. संतप्त ग्रामस्थांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर घेराव घालत हल्लेखोरांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेमुळे सोनारपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकूर कुटुंबीयांनी केलेल्या हल्ल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.






