कल्याण : रवी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘UDAAN 2026 – Felicitation Ceremony’ या प्रेरणादायी सोहळ्यात कल्याण पश्चिम परिसरातील विविध मराठी माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता नववीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास कल्याण पश्चिम परिसरातील सुमारे २०० ते ३०० गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी शिवसेना कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक प्रशांत भामरे, विभागप्रमुख संजय राजपूत, अनंत किंगे, ओक हायस्कूलचे मुख्याध्यापक तडवी सर तसेच एस. जी. एज्युकेशनचे लतेश गवत, मनोज पाटील आणि अनिरुद्ध सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे विशेष सहकार्य लाभले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देतानाच भविष्यात अधिक मोठे यश संपादन करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यात आली.
“आजचा सत्कार म्हणजे केवळ कौतुक नाही, तर उद्याच्या यशस्वी पिढीला दिलेली प्रेरणा आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे रवी पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध रवी पाटील यांनी आभार मानले.






