पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी पालिका अधिकाऱ्यांसह कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील आदिवासी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान वस्तीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या समस्यांची माहिती घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

आधारवाडी आदिवासी वस्तीमध्ये वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अनेक समस्या असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. परिसरातील अस्वच्छता आणि अव्यवस्था पाहून महापौर हर्षाली चौधरी यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
रहिवाशांना केवळ आधारवाडी परिसरातच नव्हे, तर पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी आधारवाडीतील प्रमुख समस्या प्राधान्याने सोडवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापौरांच्या या पाहणीमुळे आधारवाडीतील आदिवासी वस्तीच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, आता या समस्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही होण्याची अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.






