कल्याण पूर्व : कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरातील जागेच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. जागेच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या या वादात बिल्डर केंदळे यांनी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाणीचा, तर पोलिसांवर न्याय न देता दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कैलास नगर येथील जागेच्या मालकी हक्कासह संबंधित कागदपत्रांवरून वाद सुरू असल्याचे केंदळे यांनी सांगितले. या वादातून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी, “नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी मला बेदम मारहाण केली. पोलिसांकडे दाद मागितल्यानंतरही मला न्याय मिळाला नाही, उलट माझ्यावरच दबाव टाकण्यात आला,” असा आरोप केला आहे.
या आरोपांमुळे कैलास नगरमधील जागेच्या वादाला केवळ मालकी हक्काचा प्रश्न न राहता आता मारहाण आणि पोलिसांच्या भूमिकेचेही गांभीर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी केंदळे यांनी केली आहे.
दरम्यान, बिल्डर केंदळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर नगरसेवक महेश गायकवाड यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. तसेच पोलिस प्रशासनाकडूनही या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पोलिस तपासातून समोर येणारी वस्तुस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.
कैलास नगरमधील या वादामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, जागेच्या मालकीचा नेमका हक्क कोणाचा आणि या वादातून घडलेल्या कथित मारहाणीमागील वस्तुस्थिती काय, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.






