डोंबिवली : वाढदिवसाचा आनंद केवळ जल्लोषात न साजरा करता समाजाच्या आरोग्यासाठी समर्पित करण्याचा आदर्श उपक्रम भाजपचे कल्याण जिल्हा सचिव ओमनाथ नाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात राबविण्यात आला. भाजप नगरसेविका आर्या ओमनाथ नाटेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन, डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि कल्याण लाईफ लाईन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची विविध आरोग्य तपासणी केली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, कॅन्सर स्क्रीनिंग तसेच विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
तपासणीनंतर नागरिकांना आवश्यक औषधे देतानाच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन व योग्य वैद्यकीय सल्ला दिला. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांनी या संधीचा लाभ घेतला.
वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसेवेचा हा उपक्रम राबवून ‘निरोगी नागरिक हीच खरी समाजाची संपत्ती’ हा संदेश देण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत तपासणी करून घेतल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






