कल्याण पूर्व : आडीवली-ढोकळी परिसरात यंदाच्या रक्षाबंधनाला बहीण-भावाच्या स्नेहबंधाला अनोखा रंग पाहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्याला प्रभागातील शेकडो महिला भगिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या सोहळ्यासाठी महिलांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. महिलांनी कुणाल पाटील यांचे औक्षण करून राखी बांधली आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राखी बांधताना महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहता कार्यालय परिसरात जणू कौटुंबिक स्नेहमेळाव्याचेच वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी कुणाल पाटील यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचे आभार मानत त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा आदर राखण्याची भावना व्यक्त केली. राखीच्या पवित्र धाग्यातून निर्माण झालेला हा स्नेहबंध आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे रक्षाबंधन सोहळा विशेष ठरला.
महिलांची मोठी उपस्थिती, उत्साहपूर्ण वातावरण आणि बहीण-भावाच्या नात्यातील आपुलकी यामुळे आडीवली-ढोकळीतील रक्षाबंधन सोहळा आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाला.






