
डोंबिवली : भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक १९ मधील खंबाळपाडा गाव व परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला. स्व. शिवाजी दादा शेलार (माजी नगरसेवक) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे चिरंजीव तथा नगरसेवक साई शिवाजी शेलार यांच्या पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
संचाळपाडा येथील नगरसेवक साई शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत परिसरातील नागरिकांना तातडीने आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, तसेच आर्थिक अडचणींमुळे उपचारासाठी विलंब होऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
२४x७ मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाल्याने खंबाळपाडा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्व. शिवाजी दादा शेलार यांच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेत आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या मदतीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे नगरसेवक साई शेलार यांनी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्यास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.






