कल्याण लोकसभेत मोफत बससेवेचे आयोजन; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तिकीट वाटपाचा शुभारंभ
डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची वाट यंदाही सुखकर होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून आणि शिवसेना कल्याण लोकसभेच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष बससेवेच्या तिकीट वाटपाचा शुभारंभ शनिवार, २९ ऑगस्ट रोजी कळवा, दिवा आणि उल्हासनगर येथे करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिनिधिक स्वरूपात गणेशभक्तांना प्रवासाची तिकिटे वितरित केली.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी विशेष बससेवा
गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी विशेष बसगाड्या गावाकडे रवाना होणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने चाकरमानी वास्तव्यास आहेत. रोजगार आणि व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेल्या या नागरिकांसाठी गणेशोत्सव हा आपल्या गावाशी, कुटुंबाशी आणि मातीतल्या संस्कृतीशी जोडणारा जिव्हाळ्याचा सण आहे.
रेल्वे आणि एसटीवरील ताणापासून दिलासा
गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रेल्वे आणि एसटी सेवांवर मोठा ताण येतो. तिकीट मिळविण्यासाठी होणारी गर्दी, प्रवासातील गैरसोय आणि वाढता खर्च यामुळे चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पूजासाहित्याचीही सुविधा
मोफत बससेवेबरोबरच गणेशभक्तांना गणपती पूजेसाठी आवश्यक पूजासाहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गावी पोहोचल्यानंतर गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांना मदत होणार आहे.
गणेशभक्तांकडून आभार
गावी जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गणेशभक्तांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना आपल्या कुटुंबासह गावच्या मातीत सण साजरा करता यावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.






