
मुंबई : कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या आम्ही ४३ यात्रेकरूंनी नुकताच अत्यंत थरारक, भावनिक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव घेतला. कैलास पर्वताचे दर्शन घेण्याच्या आध्यात्मिक समाधानासोबतच नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे येथे आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीचे भयावह परिणाम, त्यानंतर चीनमध्ये निर्माण झालेली मन सुन्न करणारी परिस्थिती आणि अखेरीस कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून भारतात सुखरूप परतण्याचा प्रवास, हा आम्हा यात्रेकरूंसाठी अक्षरशः मृत्यूच्या छायेतून परतीचा प्रवास ठरला.
या संपूर्ण संकटकाळात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे निकटवर्तीय श्री. अभिजीत दरेकर साहेब तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी ( RDC) डॉ. संदीप माने साहेब, कल्याणचे तहसीलदार श्री. विकास गारुडकर साहेब आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी घेतलेली काळजी व केलेला पाठपुरावा तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश मोरे साहेबांनी वेळोवेळी केलेला संपर्क आम्हा यात्रेकरूंसाठी मोठा आधार ठरला.
मी आणि माझी पत्नी सौ. प्रतीक्षा प्रकाश माने व इतर ५० जण रुद्र टुर ॲड ट्रॅव्हल मार्फत कैलास-मानसरोवर येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी गेलो होतो. मुंबई ते काठमांडू विमानाने आणि त्यानंतर काठमांडू ते तिमुरेपर्यंत आम्ही बसने प्रवास केला. तिमुरे येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम करताना तेथील हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी आमचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. दिवसभर चहा-नाश्ता, रात्रीचे जेवण आणि अगदी घरच्या माणसांप्रमाणे केलेली विचारपूस आजही मनात ताजी आहे. हॉटेलपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या त्रिशूली नदीच्या परिसरातील तिमुरे बॉर्डरवर इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही कैलास – मानसरोवरच्या दर्शनासाठी चायना देशात प्रवेश करत पुढे निघालो.
चीन मधील कैलास-मानसरोवर येथे पोहोचल्यानंतर तिमुरे येथे दुर्घटना घडल्याची बातमी आम्हाला समजली. सुरुवातीला ही दुर्घटना एवढी भयंकर असेल, याची कल्पनाही नव्हती. भाषेची अडचण असल्याने चिनी प्रशासनाकडून मिळणारी माहिती आम्हाला समजत नव्हती. मात्र सोशल मीडिया, नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडून माहिती मिळू लागल्यानंतर तिमुरे येथे घडलेल्या नैसर्गिक आपत्तीचे भयावह स्वरूप हळूहळू समोर आले.
ज्या हॉटेलमध्ये आम्ही काही काळापूर्वी चहा-नाश्ता केला, जेवण केले, ज्या लोकांनी आमची सेवा केली आणि आम्हाला कैलास-मानसरोवर यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या, त्यापैकी सर्वजण या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडल्याचे समजल्यानंतर मन सुन्न झाले. हॉटेल, परिसरातील इतर हॉटेल्स, वाहने, रस्ते आणि नेपाळ-चीन सीमेवरील मजबूत पूलदेखील या प्रचंड नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून गेले. चिनी बाजूकडील इमिग्रेशन सेंटरची भव्य व मजबूत इमारत आणि परिसर, शेकडो वाहने आणि तेथे कार्यरत असलेले चिनी, नेपाळी व तिबेटी कर्मचारी तसेच भगवान महादेवाच्या दर्शनासाठी आतुरतेने निघालेले आमच्या सारखे शेकडो भाविक या आपत्तीचे बळी ठरले आणि क्षणांत होत्याचे नव्हते झाले.
कैलास-मानसरोवरचे दर्शन व परिक्रमा पूर्ण करून आम्ही सागा या शहरात आलो, तोपर्यंत या संकटाची पूर्ण तीव्रता जाणवत नव्हती. मात्र सागा येथे आल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे जाणवले. चीन सरकारच्या निर्देशांमुळे आमच्या पुढील प्रवासावर निर्बंध आले आणि नेपाळमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद झाल्याने जगभरातून आलेले यात्रेकरू चिंतेत पडले.
आमच्यासोबत नेपाळमधील टुरिस्ट कंपनीचे ९ कर्मचारी देखील होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता – आता घरी कसे जायचे ?या परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा, याचा विचार सुरू असतानाच मी तातडीने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांचे निकटवर्तीय श्री. अभिजीत दरेकर साहेबांच्या संपर्कात राहिलो. अभिजीत दरेकर साहेबांनी तातडीने खासदार साहेबांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही सुरू केली. त्यानंतर जणू काही चक्रे वेगाने फिरू लागली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कल्याण तहसीलदार कार्यालय, महाराष्ट्र राज्य आणीबाणी नियंत्रण कक्ष आणि शासनाच्या विविध विभागांमधून आमच्याशी संपर्क सुरू झाला.
आमची परिस्थिती काय आहे, आम्ही कुठे आहोत, आमच्याकडे अडचण आहे का, पुढील प्रवास कसा होणार आहे — शासनाच्या विविध विभागां मार्फत याची वेळोवेळी चौकशी केली जाऊ लागली.
या संपूर्ण प्रसंगात विशेष उल्लेख करावा लागेल तो ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने साहेबांचा. गेल्या तीन दिवसांत त्यांनी सुमारे सहा वेळा स्वतः फोन करून आमची विचारपूस केली. हा केवळ प्रशासकीय संपर्क नव्हता, तर एखाद्या नातेवाईकाने परदेशात अडकलेल्या आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, अशा आपुलकीने त्यांनी आमच्याशी संवाद साधला.
“काळजी करू नका, काही मदत लागली तर आम्हाला सांगा,” या शब्दांनी परदेशातील संकटात असलेल्या आम्हा यात्रेकरूंना मोठा मानसिक आधार दिला.
कल्याण तालुक्याचे तहसीलदार श्री. विकास गारुडकर साहेब यांनीदेखील स्वतः फोन करून आमची विचारपूस केली आणि कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडूनही आमच्याशी संपर्क साधण्यात आला आणि आम्हाला सुरक्षितपणे आपल्या देशात परतण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची खात्री देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आम्हाला संपर्क करून ”तुम्ही एकटे नाही”, “काळजी करू नका, भारत सरकारच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल,” असा विश्वास दिला. परदेशातील दुर्गम भागात अडकलेल्या यात्रेकरूंसाठी ही भावना अत्यंत महत्त्वाची होती.
विशेष म्हणजे आमच्यासोबत असलेल्या कॅनडा, फ्रान्स आणि इंग्लंडमधील यात्रेकरू नागरिकांनीही महाराष्ट्रातून मिळणाऱ्या या तत्पर मदतीचे कौतुक केले. भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील प्रशासन इतक्या बारकाईने आपल्या नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांची काळजी घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
अखेर २९ ऑगस्ट २०२६ रोजी चीन-नेपाळ जोडणाऱ्या अतिरिक्त कोदारी बॉर्डरमार्गे आम्हाला नेपाळमध्ये प्रवेश देण्यात आला.
सकाळी सुमारे ६ वाजता प्रवास सुरू करून आम्ही चीनमधून कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश केला आणि कोदारी ते काठमांडू असा प्रदीर्घ खडतर प्रवास करत २९ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजता काठमांडू येथील मंडाला नॉर्लिंग लॉर्ड्स प्राईम हॉटेलमध्ये सुखरूप पोहोचलो.
आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर त्या वेळी सुटकेचा आनंद होता आणि अखेर आज रविवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता नेपाळ एअरलाइन्सच्या RA 201 या विमानाने महाराष्ट्रात राहणारे आम्ही भाविक काठमांडूहून मुंबईकडे प्रयाण केले आणि सुखरूप मुंबईत पोहोचलो.
या संपूर्ण घटनेकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तिमुरे येथे घडलेली आपत्ती ही अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्ती होती अशा नैसर्गिक संकटासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा देशाला दोष देणे योग्य ठरणार नाही. मात्र संकट आल्यानंतर नागरिकांच्या पाठीशी कोण उभे राहते, ही खरी कसोटी असते आणि या कसोटीच्या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून श्री. अभिजीत दरेकर साहेब यांनी केलेला पाठपुरावा, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने साहेब, आमदार श्री राजेश मोरे साहेब, कल्याण तहसीलदार श्री. विकास गारुडकर साहेब, आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी केलेले सहकार्य आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
तसेच संपूर्ण काळात आमची वेळोवेळी विचारपूस करणाऱ्या कल्याण – डोंबिवली शहरातील पत्रकार बांधवांचेही मनःपूर्वक आभार कारण परदेशातील संकटाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि यात्रेकरूंच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने चिंता व्यक्त करणे, हेही तितकेच महत्त्वाचे होते.
कैलास-मानसरोवर यात्रेत आम्हाला भगवान महादेवाचे दर्शन झाले; परंतु या संपूर्ण संकटातून परतताना माणुसकी, प्रशासनाची संवेदनशीलता आणि लोकप्रतिनिधींची तत्परता यांचेही दर्शन झाले.
तिमुरेतील त्या हॉटेलमधील माणसे, नेपाळ आणि चायना इमिग्रेशन सेंटरव्दारे आम्हाला सेवा देणारे अनेक शासकिय अधिकारी व कर्मचारी, कैलास मानसरोवरचे दर्शनासाठी आलेले शेकडो भाविक आज आपल्यात नाहीत ही वेदना कायम मनात राहील, या सर्वांना मनःपूर्वक श्रद्धांजली आणि आमच्यासारख्या ४३ यात्रेकरू व ९ नेपाळी कर्मचाऱ्यांच्या संकटकाळात “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” या भावनेने उभे राहिलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार !
हर हर महादेव!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
प्रकाश शांताराम माने.
(एक कैलास मानसरोवर यात्रेकरू)






