वृषाली श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली महिलांची मैफल
उल्हासनगर : श्रावण मासाच्या निमित्ताने सखी सामाजिक महिला संस्था (रजि.) यांच्या वतीने आयोजित भव्य मंगळागौर सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सखी सामाजिक महिला संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या पुढाकाराने शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी उल्हासनगर येथील शहीद जनरल अरुणकुमार वैद्य सभागृहात (टाऊन हॉल) हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगरच्या महापौर सौ. अश्विनी निकम, अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड, उल्हासनगरचे आमदार कुमार अयलानी तसेच माजी आमदार पप्पू कलानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सभागृह नेते व गटनेते अरुण आशान, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीना सोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पारंपरिक खेळांसह मनोरंजनाची मेजवानी
मंगळागौर सोहळ्यात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक मंगळागौर खेळांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लकी ड्रॉ, मनमोहक संगीत, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सेल्फी पॉइंट यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
स्त्रीशक्ती आणि संस्कृतीचा जागर
श्रावणातील पारंपरिक मंगळागौर उत्सवाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याबरोबरच स्त्रीशक्तीचा जागर आणि मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सखी सामाजिक महिला संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सचिन कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.






