अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त; सणासुदीपूर्वी समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर, अंबिकानगर तसेच प्रभाग क्रमांक १९ मधील सागर्ली, एमआयडीसी, इंदिरानगर व खांबालपाडा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी भव्य ‘पाणीबाणी मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील नागरिकांसह महिला व माता-भगिनींची मोठी उपस्थिती होती.
महिनाभरापासून पाणीटंचाई
गेल्या महिनाभरापासून संबंधित परिसरात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या समस्येबाबत भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली होती. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जलवाहिन्यांची तपासणी करण्यात आली असली तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना फटका
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना बसत आहे. दैनंदिन गरजांसाठी पाण्याची व्यवस्था करताना अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या पंधरा वर्षांत या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवली नव्हती, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
बारवी धरण भरलेले, तरी पाणीटंचाई
परिसराला बारवी धरणातून पाणीपुरवठा होत असताना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. असे असतानाही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा का होत नाही, असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. एका बाजूला खासगी टँकरद्वारे पाणी उपलब्ध होत असताना महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, याबाबतही नागरिकांनी प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले.
अधिकाऱ्यांना निवेदन; सणांपूर्वी उपाययोजनेची मागणी
मोर्चादरम्यान महापालिकेचे संबंधित अधिकारी शैलेश मळेकर व मादलेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीटंचाई तातडीने दूर करण्याची मागणी केली.
जन्माष्टमी, गणेशोत्सव व नवरात्रीसारखे सण जवळ आले असताना पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढतील, असे सांगत प्रशासनाला सणासुदीपूर्वी समस्या सोडविण्याचा इशारा देण्यात आला. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.
‘चमचाभर पाण्या’चा उपरोधिक संदेश
परिसरातील काही इमारतींना अनेक दिवस पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना उपरोधिक स्वरूपात चमचे भेट देण्यात आले. ‘नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने किमान चमचाभर पाणी तरी मिळावे,’ असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाचे लक्ष पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे वेधण्यात आले.
मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, गटनेते शशिकांतजी कांबळे, नगरसेवक महेश बाबूराव पाटील, नगरसेविका मंदाताई पाटील, डॉ. सुनीताताई पाटील, सायलीताई विचारे, पूजाताई पाटील, साई शेलार, अभिजीत थरवळ, विनोद काळण, ॲड. मंदार टावरे, भाजप प्रभाग प्रभारी ॲड. मनोज प्रकाश घरत, संजय राणे, संजय विचारे, मिहीर दवते यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






