सम्राट अशोक विद्यालयात नऊ वर्षांपासून बैलपोळा सणाची परंपरा
कल्याण : ग्रामीण भागात उत्साहात साजरा होणारा बैलपोळा सण शहरी भागात दुर्मिळ होत चालला आहे. या पारंपरिक सणाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळावी आणि शेती, शेतकरी व पशुधनाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने कल्याण पूर्वेतील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून बैलपोळा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
बैलजोडीची सजावट व पूजा
यंदाही कोन गावातील शेतकरी बजरंग म्हात्रे यांची बैलजोडी शाळेत आणून बैलपोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी बैलांची आकर्षक सजावट करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली. सहशिक्षिका संगीता महाजन, उर्मिला साबळे आणि विद्या घोणमोडे यांनी बैलांची सजावट केली.
विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता सातवीतील पार्थ बनसोडे, इयत्ता दहावीतील श्रावणी रांजवण तसेच शिक्षकांनी बैलांची पूजा केली. सहशिक्षिका भारती सानप यांनी बजरंग म्हात्रे यांच्या परिवाराला साडी व कपडे देऊन त्यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांना परंपरेची प्रत्यक्ष अनुभूती
बैलपोळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतकरी, शेती आणि पशुधन यांचे महत्त्व जवळून समजून घेता आले. ग्रामीण जीवनाशी जोडलेल्या या परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






