कल्याण लोकसभा मतदारसंघातून ९०० हून अधिक मोफत एसटी बस; सुमारे ४५ हजार गणेशभक्तांना लाभ
कल्याण : गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना कल्याण लोकसभेच्या माध्यमातून यंदा ९०० हून अधिक मोफत एसटी बस रवाना होणार आहेत. डोंबिवलीतून सुमारे ३५०, कल्याण पूर्वेतून २१०, दिव्यातून १५० हून अधिक, तर उर्वरित बस अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा शहरातून रवाना होणार आहेत.
डोंबिवली, दिव्यातील ५०० बसची व्यवस्था
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील एसटी आगारातून या बस गुरुवारी दुपारपासून संबंधित शहरांमध्ये दाखल होणार आहेत. डोंबिवली आणि दिवा शहरातील सुमारे ५०० बस कल्याण-शीळ रोडवरील सामंत पेट्रोल पंपासमोरील प्रीमियर कंपनी मैदान, संदप, दिवा रोड येथे प्रथम आणण्यात येणार आहेत. त्यानंतर गणेशभक्तांनी नोंद केलेल्या परिसरानुसार या बस संबंधित ठिकाणी पाठविण्यात येतील.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून या बस कोकणातील रायगड, खेड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध गावांसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराडच्या दिशेने रवाना होणार आहेत. कल्याण-डोंबिवलीतील बस कल्याण-शीळ मार्गे पुढील प्रवासाला निघणार आहेत.
कोविड काळापासून उपक्रम सुरू
कोकणातील गणेशभक्तांना गणेशोत्सव आपल्या गावी आनंदाने साजरा करता यावा, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड काळापासून हा उपक्रम सुरू केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात महागाई आणि रेल्वे आरक्षणाच्या अडचणींचा सामना करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे. गणेशभक्तांच्या मागणीनुसार यंदा कोकणाबरोबरच सातारा, सांगली, कराड आणि कोल्हापूरसाठीही मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
४५ हजार गणेशभक्तांना लाभ
यंदाच्या बहुतांश बसमध्ये ५५ आसनांची व्यवस्था असून, कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुमारे ४५ हजार गणेशभक्त या मोफत बससेवेचा लाभ घेणार आहेत. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना, महिला सेना आणि शिवसैनिक गेल्या महिनाभरापासून नियोजन व व्यवस्थापनाच्या कामात कार्यरत आहेत. स्वतःचा गणेशोत्सव सांभाळत गणेशभक्तांना त्यांच्या गावापर्यंत सुखरूप पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.






