कल्याण : गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) श्री. अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (१२ सप्टेंबर) कल्याण शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.

सायंकाळी ६ वाजता महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून रूट मार्चला सुरुवात झाली. मोहम्मद अली चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करून शंकरराव चौक, घेलादेवजी चौक, गांधी चौक, जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन, दूधनाका, पारनाका मार्गे लाल चौकी येथे सायंकाळी ६.४० वाजता रूट मार्चची सांगता झाली.
या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक होनमाने यांच्यासह १३ पोलीस अधिकारी, ७२ पोलीस अंमलदार, ३२ नवप्रविष्ट पोलीस अंमलदार, ४२ एसआरपीएफ अंमलदार, २० होमगार्ड, तसेच २ सीआरएम मोबाईल, २ पीटर मोबाईल आणि २ बीट मार्शल सहभागी झाले होते.
गणेशोत्सव काळात शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची दक्षता वाढविण्यासोबतच नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला.






