केडीएमसीच्या आरोग्य केंद्रांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत शेकडो वैद्यकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. गणेशोत्सवाच्या काळातही पगार रखडल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. “पगाराविना घर कसे चालवायचे, गणपतीचा सण कसा साजरा करायचा?” असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला.
महापालिका आयुक्तांना निवेदन
केडीएमसी क्षेत्रातील ५६ आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि ५ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने येथे एजन्सीमार्फत अटेंडंट, सुरक्षा व स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. पगार न मिळाल्याने अभय भोईर, संतोष भालेर, विशाल सोरटे, पूजा ठाणगे, रूपाली दातखिळे, सुरेखा सोनवणे, सतीश भालेराव, योगेश बागूल यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालय गाठले. त्यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
कंत्राटाची मुदत संपणार
मिळालेल्या माहितीनुसार, या कामासाठी अटेंडंट कम सिक्युरिटी गार्ड आणि क्लिनिंग स्टाफ मिळून २६८ कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने काम करण्यास मंजुरी आहे. सध्या सुमारे १३० कर्मचारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यरत आहेत. संबंधित कंत्राटदाराची मुदत संपत असून नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नसल्याने कर्मचाऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तुटपुंज्या वेतनातही पगार रखडला
कार्यादेशानुसार प्रति कर्मचारी १५ हजार ५०० रुपये वेतन असताना अटेंडंटच्या हातात कपातीनंतर सुमारे ८ हजार रुपये, तर क्लिनिंग कर्मचाऱ्यांच्या हातात सुमारे ७ हजार रुपये वेतन मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातही पगार वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आजारपणाची रजा, इतर सुट्ट्या तसेच बोनस मिळत नसल्याची तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली.
थकीत वेतन देण्याच्या सूचना
यासंदर्भात केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी संबंधित कामाचा कार्यकाल संपला असून नवीन निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. संबंधित एजन्सीला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना थकीत पगार कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






