आरोप-प्रत्यारोपांनी महासभा गाजली; काँग्रेस, उबाठाकडूनही तहकुबीवर सवाल
कल्याण : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविण्याच्या वादाचे पडसाद कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपा गटनेते शशिकांत कांबळे यांनी या मुद्द्यावरून महासभा स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर हर्षाली थवील चौधरी यांनी बुधवारीची महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब केली. महासभा तहकूब होताच भाजपा आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू झाली.
भाजपा-मनसेतील संघर्ष तीव्र
केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती असून मनसेही शिवसेनेसोबतच्या आघाडीमुळे सत्तेचा भाग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. भाजपाकडून मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी केली जात असताना मनसेकडून भाजपानेच सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान दिले जात आहे.
‘सत्तेची मलाई खाण्यासाठी सत्तेत राहिला आहात’
मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपावर जोरदार पलटवार केला. “इतका विरोध आहे तर सत्तेतून बाहेर पडा. सत्तेची मलाई खाण्यासाठी सत्तेत राहिला आहात. महापौर आम्ही बसवला आहे. आमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही सत्तेतून बाहेर पडा,” अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस, उबाठाकडूनही सवाल
दरम्यान, भाजपा-मनसेच्या राजकीय वादावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही सवाल उपस्थित केले. महासभेत नागरिकांच्या समस्या, शहरातील विकासकामे तसेच विविध नागरी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना राजकीय वादामुळे संपूर्ण दिवसाची महासभा तहकूब करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
नागरी प्रश्न बाजूला ठेवून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सत्तासमीकरण बदलण्याची चर्चा
भाजपा आणि मनसेमधील वाढता संघर्ष पाहता आगामी काळात केडीएमसीच्या सत्तासमीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अडीच वर्षांनंतर सत्तेचे समीकरण काय राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपा आणि मनसेमधील मतभेद आणखी वाढल्यास शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या शिवसेनेकडून या घडामोडींवर लक्ष ठेवत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपा-मनसेतील संघर्ष आगामी काळात केडीएमसीच्या सत्तासमीकरणाला कोणते वळण देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपने सत्ता सोडली तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही”
“भाजपने सत्ता सोडली तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. ते सत्तेत वाटा घेण्यासाठी आले आहेत, त्यामुळे आता त्यांनी निर्णय घ्यावा आणि सत्तेतून बाहेर पडावे. आम्ही सक्षम आहोत. आमच्यामुळेच महापौर बसले आहेत.”
— गणेश लांडगे, नगरसेवक, मनसे

“एकतर्फी महासभा तहकूब केली; कुणालाही बोलू दिले नाही”
“महासभा एकतर्फी तहकूब करण्यात आली. यावेळी कुणालाही आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली नाही. मनसेला महासभा तहकूब करणे मान्य होते, त्यामुळे आम्हालाही काही बोलता आले नाही. महासभेत नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना अशा पद्धतीने महासभा तहकूब करणे योग्य नाही.”
— संकेंश भोईर, नगरसेवक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)






