खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून चाकरमान्यांना गावाकडे जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा
कल्याण : गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिम तसेच मोहने-टिटवाळा विभागातील गणेशभक्तांसाठी तब्बल २० मोफत एसटी बसेस शुक्रवारी सायंकाळी भगवा झेंडा दाखवून गावाकडे रवाना करण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण व पश्चिम महाराष्ट्राकडे मोठ्या संख्येने चाकरमानी रवाना होत असतात. त्यामुळे प्रवासाचा वाढता खर्च आणि वाहतुकीची गर्दी लक्षात घेता आयोजित करण्यात आलेल्या या मोफत बससेवेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कुटुंबीयांसह गावी जाणाऱ्या गणेशभक्तांमध्ये यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, किरण भांगले, प्रतीक पेणकर, रुपेश सकपाळ, नगरसेविका अनघा देवळेकर, प्रमिला पाटील, अस्मिता मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवा झेंडा दाखवत २० बसेस गावाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. गणरायाच्या आगमनापूर्वीच चाकरमान्यांना सुरक्षित, सुखकर आणि मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.






