सहा महिन्यांचे आव्हान अवघ्या तीन दिवसांत पूर्ण; जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भाजप नगरसेवक दया गायकवाडांकडून कौतुक
कल्याण : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र केलेल्या अथक प्रयत्नांमुळे महत्त्वाचे काम अवघ्या तीन दिवसांत पूर्ण झाले. नियोजित कामासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असताना ते काम केवळ तीन दिवसांत पूर्ण केल्याबद्दल भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी KDMCच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
पूराच्या पाण्यात उतरून, प्रतिकूल परिस्थितीत तसेच दिवस-रात्र काम करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा आणि धाडस उल्लेखनीय असल्याचे गायकवाड यांनी म्हटले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अनेक अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत राहिले. त्यांच्या या योगदानामुळेच अत्यंत कमी कालावधीत काम पूर्ण करणे शक्य झाले.
या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांना प्रोत्साहनपर एक वर्षाचे मानधन देण्यात यावे, असा प्रस्ताव दया गायकवाड यांनी मांडला आहे. यासंदर्भातील निवेदन KDMC सचिवांकडे सादर करण्यात आले असून, या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनासाठी संकटकाळात खंबीरपणे उभे राहून काम करणाऱ्या या ‘जलयोद्ध्यांच्या’ कार्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. त्यांच्या मेहनतीची योग्य दखल घेतल्यास भविष्यातही आपत्तीच्या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भूमिका गायकवाड यांनी व्यक्त केली.






