गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा; ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील रामबाग क्रमांक चार परिसरासह नगरसेवकांच्या कार्यालयासमोरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला नगरसेविकांनी केला. याचा निषेध नोंदवण्यासाठी नगरसेविका स्वप्नाली केणे आणि अपर्णा भोईर यांनी पालिकेचे उपअभियंता रजपूत यांच्या कार्यालयात जाऊन चक्क खड्ड्यांचे प्रतीक असलेली शाल अधिकाऱ्यांना परिधान करून अनोख्या पद्धतीने ‘सत्कार’ केला.
दोन दिवसांतच रस्त्यावर पुन्हा खड्डे
नगरसेविकांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या दोन दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी वर्दळ होणार असल्याने त्यापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी नगरसेविकांनी केली.
‘चांगली शाल घेऊन पुन्हा सत्कार करू’
खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या अनोख्या निषेधादरम्यान नगरसेविकांनी प्रशासनाला उपरोधिक टोला लगावला. रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली तर यापुढे खड्ड्यांची नव्हे, तर चांगली शाल आणून अधिकाऱ्यांचा सत्कार करू, असे त्यांनी म्हटले.
कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची आवश्यक कामे पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त मार्ग उपलब्ध करून न दिल्यास ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वप्नाली केणे आणि अपर्णा भोईर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.






