शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणात पाचही आरोपी कोर्टात हजर; तीन महिन्यांत निकालाचे उद्दिष्ट
कल्याण : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह पाचही आरोपी शुक्रवारी कल्याण सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश जे. डी. वासाडे यांच्या दालनात आरोपींच्या वतीने तीन वकिलांनी संयुक्तपणे युक्तिवाद केला. सुनावणीनंतर रमेश म्हात्रे केडीएमसीच्या महासभेला उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले.
तीन महिन्यांत निकालाचे उद्दिष्ट
दोषारोपपत्र मोठे असल्याने ते वाचण्यासाठी काही कालावधी द्यावा, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकरणाचा निकाल तीन महिन्यांत देण्याचे उद्दिष्ट असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे सुनावणी लांबविण्याऐवजी लागोपाठ तारखा देण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.
१५ सप्टेंबरपर्यंत सरकारी पक्षाची कागदपत्रे
सरकारी पक्षाकडून १५ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे आणि साक्षीदारांची यादी सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर कोणती कागदपत्रे मान्य अथवा अमान्य आहेत, याबाबत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद होणार असून पुढे साक्षी-पुराव्यासाठी तारखा निश्चित केल्या जाणार आहेत.
आरोप नाकारल्याची माहिती
ॲड. उमर काजी यांच्या माहितीनुसार, रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व पाच आरोपींनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. आता हे प्रकरण प्रत्यक्ष खटल्याच्या टप्प्याकडे पुढे जाणार आहे.
दरम्यान, न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रमेश म्हात्रे केडीएमसीच्या सुरू असलेल्या महासभेत दाखल झाले. यावेळी केडीएमसीचे सचिव किशोर शेळके यांनी महासभेत त्यांचे स्वागत केले.






