
नाग्या कातकरी, राघोजी बांगरे, बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी वारशाचे स्मरण; जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणाचा निर्धार
टिटवाळा, दि. १० : आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि क्रांतिकारी इतिहासाचा जागर घडवत ९ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त टिटवाळ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सावरकर नगर ते टिटवाळा मंदिर या मार्गावर निघालेल्या या मिरवणुकीला आदिवासी समाजबांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कला आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला.
क्रांतिवीरांच्या स्मृतींना अभिवादन
८ ऑगस्ट क्रांतिकारक दिन आणि ९ ऑगस्ट आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नाग्या कातकरी, राघोजी बांगरे आणि बिरसा मुंडा यांसारख्या क्रांतिवीरांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी आदिवासी समाजाने दिलेल्या संघर्षाची आठवण करून देत हा लढा आणि क्रांतिकारकांचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘आदिवासी हे निसर्गाचे खरे रक्षक’
यावेळी बोलताना श्रमजीवी संघटना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर बनसोडे म्हणाले, “जमीन आणि निसर्गाचे खरे रक्षक आदिवासी बांधव आहेत. महिलांवर आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात संपूर्ण समाजाने एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. क्रांतिवीरांनी दिलेल्या लढ्याचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
सामाजिक कार्यकर्ते हेमंत गायकवाड यांनी सांगितले की, “श्रमजीवी संघटना आणि आदिवासी बांधवांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मिरवणुकीच्या माध्यमातून आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि परंपरा अभिमानाने जपली जात आहे.”
‘संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवा’
प्रभाग क्रमांक ३ चे बंदेश जाधव यांनी आदिवासी समाजाला शुभेच्छा देताना आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. “आदिवासी बांधव हे निसर्गाचे खरे रक्षक आहेत. त्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही संस्कृती आणि परंपरा यापुढेही अशाच उत्साहाने जपली जावी,” असे त्यांनी सांगितले.
‘संस्कृती जपा, निसर्ग वाचवा’चा संदेश
मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, आदिवासी समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणाने मिरवणुकीचे आकर्षण वाढविले. उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हक्कांच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीतून ‘संस्कृती जपा, निसर्ग वाचवा आणि समाज एकत्र ठेवा’ असा प्रभावी संदेश देण्यात आला.






