कल्याण : आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करण्यासाठी नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती जनार्दन परशुराम म्हात्रे आणि नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे यांच्या वतीने मोफत आधार कार्ड दुरुस्ती व अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिरामध्ये आधार कार्डवरील नावातील दुरुस्ती, जन्मतारीख अपडेट, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे यासह विविध आवश्यक बदलांच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या केंद्रांवर जाण्याची गरज भासली नाही.
नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि शासकीय कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांतील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती जनार्दन परशुराम म्हात्रे, बालकल्याण महिला समिती सदस्य तथा नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे, समाजसेविका प्रियदर्शनी कुंदन म्हात्रे आणि समाजसेवक अक्षय जनार्दन म्हात्रे उपस्थित होते.
नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रांच्या सेवा सहज आणि विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उपक्रमांची मालिका पुढेही सुरू ठेवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.






