रॅली, विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार; आदिवासी समाजाच्या एकजुटीचा संदेश
कल्याण : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अटाळी-आंबिवली परिसरात समस्त आदिवासी बांधव, आदिवासी महासंघ अटाळी-आंबिवली, संयुक्त आदिवासी उत्सव समिती तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
९ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात अटाळी-आंबिवली (पूर्व) येथील गावदेवी चौकातून रॅलीने झाली. वाल्मिक विद्यालय, आंबिवली स्टेशन, भास्कर शाळा, पाटील नगर मार्गे रॅली अटाळी गावात पोहोचली. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समाजबांधवांनी ‘जय आदिवासी’, ‘जय बिरसा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमात आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि अस्मिता जपण्याचा संदेश देण्यात आला. समाजातील तरुण पिढीने शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान समाजबांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर विविध उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आदिवासी समाजाची एकजूट, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या हक्कांसोबतच आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन समस्त आदिवासी बांधव, अटाळी, आंबिवली, वडवली व मोहने परिसर यांच्या वतीने करण्यात आले. आदिवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. गौरख (नंगतसिंग) नाडे यांच्यासह समाजबांधव, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






