‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून जवानांच्या त्यागाला सलाम; दिल्लीच्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा राष्ट्रभक्तीचा संदेश

नवी दिल्ली, ता. ९ : सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जवान रक्त सांडत असताना, त्यांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र रक्तदानाच्या माध्यमातून उभा राहिला आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत जवानांच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक सलाम केला.
“सीमेवर बंदूक हातात घेऊन अहोरात्र जागणाऱ्या जवानांमुळे आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. त्यांच्या सन्मानासाठी रक्तदान करणे ही केवळ सामाजिक सेवा नसून देशसेवेची भावना आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
‘सिंदूर महारक्तदान’ हा उपक्रम केवळ रक्तसंकलनापुरता मर्यादित नसून, देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव समाजाला करून देणारा उपक्रम असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक, कार्यकर्ते, पैलवान आणि रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचे
देशहित आणि राष्ट्रसेवा कोणत्याही राजकीय चौकटीपेक्षा मोठी असल्याचे सांगत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या परंपरेचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा आजही कायम असून, त्याच भावनेतून महाराष्ट्रातील नागरिक सीमावीरांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “भारत कोणालाही छेडत नाही; मात्र भारताला कोणी छेडले तर सोडतही नाही.” भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आणि धैर्य देशाच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करून देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण सामर्थ्याचा उल्लेख
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिंदे यांनी भारताच्या वाढत्या संरक्षण सामर्थ्याचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनामुळे भारताचे संरक्षण कवच अधिक मजबूत होत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
“ज्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याची हिंमत केली जात नव्हती, त्या ठिकाणी आज तिरंगा अभिमानाने फडकत आहे,” असे सांगत त्यांनी भारताच्या बदलत्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचेही रक्तदान

या उपक्रमात शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रानेही या उपक्रमाला उत्स्फूर्त साथ दिली. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान आणि कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग घेतला.
आखाड्यात पराक्रम गाजवणाऱ्या पैलवानांनी जवानांच्या सन्मानासाठी रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. “महाराष्ट्रातील पैलवान आणि रक्तदाते यांनी देशसेवेची भावना कृतीत उतरवली आहे,” असे ते म्हणाले.
‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून रक्तदान, सैनिकांचा सन्मान आणि राष्ट्रभक्ती या तीन भावनांचा संगम घडवून महाराष्ट्राने दिल्लीच्या राजधानीत जवानांप्रती कृतज्ञतेचा संदेश दिला.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, व्हाइस अॅडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, राज्यसभा सदस्य डॉ. ज्योती वाघमारे, महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी “भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद आणि जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी दिल्ली दुमदुमली. सीमेवर जवान देशासाठी रक्त सांडत असताना, देशाच्या अंतर्गत भागातून त्यांच्यासाठी रक्तदानाची साथ उभी राहिली. ‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून महाराष्ट्राने जवानांप्रती असलेल्या कृतज्ञतेला कृतीची जोड देत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.






