गरीबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या पाठीशी प्रल्हाद जाधव
कल्याण : बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या गरीबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उमेश नगर, राजू नगर आणि गरीबाचा वाडा परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी समितीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गरीबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या माध्यमातून परिसरातील वीस सोसायट्यांतील सदस्य एकत्र येऊन कार्यकारिणीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जनसंपर्क कार्यालयाची मागणी

परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गरीबाचा वाडा येथे स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कल्याण-डोंबिवली व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्याकडे केली. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजना, कागदपत्रे, नागरी सुविधा आणि सामाजिक प्रश्नांबाबत मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संविधान जनजागृतीवर भर
भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजातील नागरिकांचे संघटन मजबूत करून सामाजिक एकोपा वाढविण्यावर समितीने भर दिला.
या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण शहराध्यक्ष दीपक पगारे, तसेच सतीश जाधव, अमोल बारसिंग, रतन शिरकोलकर, अंकुश धेंडे, तुकाराम माने, शैलेंद्र कासारे, मिलिंद, सचिन कदम, सुजय साळवी, शितल बारसिंग, नितिका शिरकोलकर, सुहास खेडेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
‘समितीला पुरेपूर पाठबळ देणार’
यावेळी बोलताना प्रल्हाद जाधव म्हणाले, “केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षांतर्गत काम करत असताना या संस्थेला माझे पुरेपूर पाठबळ असेल. परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सहकार्य करेन. आपण सर्वांनी मिळून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सर्वत्र पोहोचवूया.”
परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.






