१५ ऑगस्टनिमित्त शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या पुढाकारातून आयोजन
डोंबिवली / दि. १२ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीत यंदा भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवर संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागातून ही रॅली उत्साहात पार पडणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली.
१०० मीटरचा राष्ट्रध्वज ठरणार आकर्षण
या तिरंगा रॅलीचे प्रमुख आकर्षण तब्बल १०० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज असणार आहे. डोंबिवलीतील विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या भव्य तिरंग्यासह रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे डोंबिवलीच्या रस्त्यांवर देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह नागरिकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंगा रॅलीचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले आहे.
“तिरंगा ही आपल्या देशाच्या अभिमानाची आणि एकतेची ओळख आहे. १०० मीटरच्या राष्ट्रध्वजासह डोंबिवलीच्या रस्त्यांवर देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळेल,” अशी भावना आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केली.






