कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विकास योजनेनुसार रस्ता रुंदीकरणाचे सात प्रस्ताव सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. उर्वरित चार प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले आहे.
स्थगित ठेवण्यात आलेल्या चार प्रस्तावांपैकी निळजे येथील बुद्ध विहार ते चंद्रेशकुंज इमारतीचा प्रस्ताव शिंदे सेनेचे नगरसेवक गजानन पाटील यांच्या प्रभागातील आहे. या रस्ते रुंदीकरणाच्या विषयात बुद्ध विहार बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यावरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे या विषयासह मिळून चार विषय स्थगित ठेवण्यात आले आहे.
विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणाचे विषय स्थायी समितीपुढे मंजुरीकरिता आणले पाहिजेत असा आग्रह भाजप सदस्य दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी धरला होता. त्यानुसार या प्रकारचे सर्वच विषय स्थायी समितीसमोर आणण्याचे आदेश गेल्या महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापतींनी दिले होते.






