
महापुरुषांना अभिवादन, फाळणीच्या आठवणींना उजाळा; तिरंगा रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
कल्याण / दि. १२ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हे कार्यक्रम राबविण्यात येणार असून, देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
१३ ऑगस्टला महापुरुषांना अभिवादन
१३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात येणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
फाळणीच्या वेदनांना उजाळा
१४ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील परिस्थिती, त्या काळात नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या यातना आणि फाळणीमुळे झालेल्या परिणामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून फाळणीच्या इतिहासाची आणि त्यातील वेदनादायी घटनांची जाणीव नागरिकांना करून देण्यात येणार आहे.
तिरंगा रॅलीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
१४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. तिरंग्याच्या माध्यमातून देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
१५ ऑगस्टला विविध कार्यक्रम
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण जिल्हा भाजपच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, केडीएमसी उपमहापौर राहुल दामले, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि केडीएमसीचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन १३ ते १५ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
“देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे,” असे राहुल दामले यांनी सांगितले.






