भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा धक्कादायक आरोप; पालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
डोंबिवली / दि. १२ : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिमोग्लोबिन कमी झाल्याने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी रुग्णालयात तब्बल तीन वेळा पॉझिटिव्ह आल्याचा दावा भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. मात्र, त्याच मुलीची बाहेरील खासगी रुग्णालयात तपासणी केली असता गर्भधारणा चाचणी निगेटिव्ह आल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणावरून शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हिमोग्लोबिन कमी असल्याने रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी हिमोग्लोबिन कमी झाल्याने तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात गेली होती. यावेळी तिची वैद्यकीय तपासणी करताना गर्भधारणा चाचणी करण्यात आली. रुग्णालयातील चाचणी तीन वेळा पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला.
खासगी रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक विरोधाभास
रुग्णालयातील अहवालावर संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित मुलीची बाहेरील खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तेथे गर्भधारणा चाचणी निगेटिव्ह आल्याने शास्त्रीनगर रुग्णालयातील तपासणीच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित झाले. अखेर संबंधित मुलगी गरोदर नसल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पालकांच्या संमतीशिवाय चाचणी केल्याचा आरोप
अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी करण्यापूर्वी तिच्या पालकांना योग्य माहिती देण्यात आली का, तसेच त्यांच्या संमतीचा विचार करण्यात आला का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली.
दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय अहवालातील या कथित विसंगतीमागील नेमके कारण काय, चाचणी प्रक्रियेत काही त्रुटी झाल्या का आणि संबंधित प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






