
सांडपाण्याच्या समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष; बल्याणीतील नागरिकांचा संताप
कल्याण : स्वाइन फ्लूनंतर आता कल्याण परिसरात लॅप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. बल्याणी परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लॅप्टोस्पायरोसिसचे निदान झाले असून, कल्याण पश्चिमेतील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आंबिवली परिसरातील अनधिकृत चाळींमधील सांडपाणी शेतजमिनीत सोडले जात असल्याने नागरिकांना त्यातूनच वारंवार ये-जा करावी लागत असल्याचा आरोप विद्यार्थ्याचे काका तथा बल्याणीचे पोलीस पाटील प्रभू भगत यांनी केला आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
साचलेले सांडपाणी, अस्वच्छ परिसर आणि प्रशासनाचा कथित हलगर्जीपणा यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यार्थ्याला झालेली लॅप्टोची लागण ही या परिस्थितीचा इशारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने तातडीने परिसराची पाहणी करून सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि साफसफाईची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.






