सव्वा दोन किलोमीटर लांबीच्या भव्य रॅलीत १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार; १०० हून अधिक सामाजिक संस्थांचा सहभाग
डोंबिवली : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत यंदा देशभक्तीचा अनोखा जागर होणार आहे. तब्बल ३५ हजार चौ. फुटांचा भव्य तिरंगा घेऊन सव्वा दोन किलोमीटर लांबीची विश्वविक्रमी तिरंगा रॅली १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक रॅलीत हजारो डोंबिवलीकर सहभागी होणार असल्याने संपूर्ण शहर तिरंगामय होण्याची शक्यता आहे.
सुमारे ५ फूट रुंद आणि सव्वा दोन किलोमीटर लांब तिरंगा घेऊन ही रॅली काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शहरातील ५० हून अधिक शाळांमधील तब्बल १५ हजार विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर १०० हून अधिक सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही भव्य रॅली डोंबिवलीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे. ३५ हजार चौ. फुटांच्या तिरंग्याखाली हजारो नागरिक एकत्र येत ‘एक देश, एक तिरंगा’चा संदेश देणार आहेत. आयोजकांच्या या विश्वविक्रमी संकल्पनेमुळे डोंबिवलीकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






