फ्रॅक्चरच्या रुग्णाला उपचाराऐवजी पुठ्ठ्याचा आधार; मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांचा रुग्णालय प्रशासनाला इशारा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित गैरव्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्रॅक्चर झालेल्या राम सोनी या रुग्णाच्या पायावर प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठ्याचा आधार देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात प्लास्टरसारखे मूलभूत वैद्यकीय साहित्यही उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या उपचारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात प्लास्टर उपलब्ध नसल्याचे सांगून बाहेरून प्लास्टरचे साहित्य आणण्यास सांगण्यात आले. उपचारापूर्वी पैशांची मागणी झाल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत उपचार मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णालयातील गैरव्यवस्था आणि हलगर्जीपणा तातडीने दूर न केल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

“रुग्णालयात प्लास्टरच उपलब्ध नव्हते, म्हणून डॉक्टरांनी पायाला पुठ्ठा लावला. शंभर रुपयांचे चार प्लास्टर बाहेरून आणायला आम्हालाच सांगण्यात आले.” — अभय सोनी, रुग्णाचा मुलगा
मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांचा इशारा

“महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात. मात्र येथे मूलभूत वैद्यकीय साहित्यही उपलब्ध नसेल आणि रुग्णांना अशा प्रकारे उपचार दिले जात असतील, तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. रुग्णालयातील गैरव्यवस्था आणि हलगर्जीपणा तातडीने दूर झाला नाही, तर मनसेच्या वतीने रुग्णालयाला टाळे ठोकण्यात येईल.” — गणेश लांडगे, नगरसेवक, मनसे






