
मोक्का, जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांतील ३ पाहिजे आरोपी जेरबंद; ४० ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत
कल्याण : कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीत खडकपाडा पोलिसांनी राबविलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मोक्का, जबरी चोरी तसेच अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख याच्याकडून तब्बल ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, अंदाजे ८ लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला.
पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ कल्याण यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली १२ ऑगस्ट रोजी पहाटेपासून आंबिवलीतील इराणी वस्तीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अंमली पदार्थविरोधी गुन्ह्यांतील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी शिताफीने घेराबंदी करून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत शमा तेहजीब इराणी (३८), मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख (३५) आणि नफिसा हाश्मी इराणी (३३) यांना अटक करण्यात आली. शमा इराणी ही खडकपाडा पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात पाहिजे होती. मोहम्मद जाफरी उर्फ शाहरुख याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व मालमत्तेविषयक गुन्हे दाखल असून तो अनेक गुन्ह्यांत पाहिजे होता. तर नफिसा हाश्मी इराणी ही मानपाडा पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणात पाहिजे होती.
दरम्यान, मोहम्मद जाफरी उर्फ शाहरुख याच्या ताब्यातून ४० ग्रॅम मेफेड्रॉन मिळून आल्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४११/२०२६, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २२(ब) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्याला १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ कल्याण अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर, बाजारपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, महात्मा फुले चौकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी, कोळशेवाडीचे पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
या विशेष मोहिमेत १७ पोलीस अधिकारी आणि ५५ पुरुष व महिला अंमलदार, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक सहभागी झाले होते. कल्याण परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे इराणी वस्तीसह परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.






