तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी विभागाचा उपक्रम; औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची नागरिकांना मिळणार ओळख
पारंपरिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या रानभाज्या शहरातील नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात ग्रामीण व आदिवासी भागात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या नागरिकांना पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांमध्ये असलेले औषधी व पौष्टिक गुणधर्म, त्यांचा आहारातील वापर आणि पारंपरिक पद्धतीने तयार केली जाणारी विविध खाद्यपदार्थांची माहितीही नागरिकांना देण्यात येणार आहे.
शहरी जीवनशैलीमुळे अनेक पारंपरिक रानभाज्या आणि त्यांचे महत्त्व नव्या पिढीपासून दूर होत आहे. ही परंपरा जपण्यासोबतच स्थानिक शेतकरी व आदिवासी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन पारंपरिक रानभाज्यांची माहिती घ्यावी आणि त्यांचा आहारात समावेश करण्यासाठी प्रोत्साहन घ्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






