डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रिबीन कापून भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात; १५ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

डोंबिवली : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीत देशभक्तीचा अभूतपूर्व सोहळा रंगला. तब्बल २५ हजार डोंबिवलीकरांच्या उपस्थितीत ३५ हजार चौरस फुटांचा भव्य राष्ट्रध्वज साकारत तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विश्वविक्रम नोंदविण्यात आला. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीने डोंबिवलीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रिबीन कापून आणि तिरंग्याच्या रंगांचे फुगे आकाशात सोडून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. घारडा सर्कल ते टिळक पुतळा मार्ग, दत्तनगर असा रॅलीचा मार्ग होता. संपूर्ण मार्गावर भारतमाता की जयच्या घोषणा, देशभक्तीपर गीतांचा गजर आणि हातात फडकणारे तिरंगे यामुळे डोंबिवली अक्षरशः तिरंगामय झाली होती.
या भव्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे १५ हजारांहून अधिक विद्यार्थी. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेत देशभक्तीचा संदेश दिला. भारतमाता तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
डॉक्टर, वकील, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणांसह समाजातील विविध घटक या रॅलीत सहभागी झाले. जात-पात, धर्म आणि सामाजिक भेद बाजूला ठेवत एकाच तिरंग्याखाली डोंबिवलीकर एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
३५ हजार चौरस फुटांचा विशाल राष्ट्रध्वज हजारो नागरिकांच्या सहभागातून सांभाळण्याचे आव्हान आयोजकांनी नियोजनबद्ध पद्धतीने पेलले. त्यामुळे हा उपक्रम केवळ रॅली न राहता राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि सामाजिक ऐक्याचा भव्य उत्सव ठरला. डोंबिवलीकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा शहराच्या इतिहासात कायम स्मरणात राहणारा ठरला.






