बेकायदा चाळी, गाळ्यांवर धडक कारवाई; बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले
टिटवाळा : टिटवाळा पूर्व परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका पथकाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत नियमबाह्य बांधकामांना चाप लावण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
टिटवाळा पूर्व परिसरात गेल्या काही काळापासून बेकायदा चाळी, गाळे आणि इतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने कारवाईचा वेग वाढवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर थेट बुलडोझर फिरवला.

पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे ‘नियम मोडाल तर कारवाई अटळ!’ असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही, तसेच नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, टिटवाळा पूर्व परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाईनंतरही नियमबाह्य बांधकामांना पुन्हा उभे राहण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर राहणार आहे.






