वारंवारच्या तक्रारींची महापौर हर्षाली चौधरींकडून दखल; अधिकारी-कर्मचाऱ्यांना खडे बोल, तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील वारंवारच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयाला अचानक भेट देत झाडाझडती घेतली. रुग्णसेवेत हलगर्जीपणा, कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि कामचुकारपणाच्या तक्रारींबाबत त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करताना स्टाफचा निष्काळजीपणा, रुग्णांशी अनियमित वर्तन, कामचुकारपणा, मेडिसिन स्टोअरमधील कारभार तसेच वारंवार गैरहजर राहणारे कर्मचारी याबाबत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.
रुग्णालयातील गैरव्यवस्थेचा थेट परिणाम सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारांवर होऊ नये, यासाठी महापौरांनी दुपारी महापौर दालनात रुक्मिणीबाई रुग्णालयातील सर्व विभागांची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी रुग्णसेवेशी संबंधित विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या.

महापौरांच्या आक्रमक पवित्र्यामुळे रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, कामचुकारपणा करणाऱ्यांची आता खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या पाहणी दौऱ्यातून देण्यात आला आहे.
“हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराची दखल घेत स्टाफचा निष्काळजीपणा, रुग्णांसोबतचा अनियमितपणा, कामचुकारपणा, मेडिसिन स्टोअर फार्मासिस्ट तसेच वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत खरडपट्टी काढण्यात आली. रुक्मिणीबाई हॉस्पिटलसंदर्भात सर्व विभागांची तातडीने आढावा बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावण्यात येणार आहेत.” — ॲड. हर्षाली विजय चौधरी, महापौर






