जमिनीच्या फेरफार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; भाजप पदाधिकारी प्रेमनाथ म्हात्रे यांचा गंभीर आरोप, चौकशीचे तहसीलदारांचे आश्वासन

कल्याण : जमिनीच्या फेरफार प्रक्रियेवरून कल्याण तहसील कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. एका शेतकऱ्याच्या जागेच्या ७/१२ उताऱ्यावर अवघ्या एका तासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरातील एका जागेचा हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप पदाधिकारी तथा विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी ही जागा खरेदी केली असून, ती पूर्वी एका शेतकऱ्याच्या नावावर होती. मात्र, ६ ऑगस्ट रोजी झालेल्या फेरफार प्रक्रियेत संबंधित शेतकऱ्यासोबत त्यांच्या एका महिला नातेवाईकाचे नाव नोंदवण्यात आले. त्यानंतर ७/१२ उताऱ्यावरही तिचे नाव चढवण्यात आल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या एका तासात पूर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘नियम सर्वांसाठी समान असावेत’
या प्रकारावर आक्षेप घेत प्रेमनाथ म्हात्रे यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फेरफार प्रक्रियेसाठी सामान्यतः नागरिकांना प्रक्रिया व हरकतीसाठी वेळ दिला जातो; मात्र या प्रकरणात कोणतीही पूर्वकल्पना न देता अत्यंत कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
तसेच, या प्रकरणामागे राजकीय दबाव असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला आहे. “सत्ता असताना माझ्यासोबत असा प्रकार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून विकासक आणि शेतकऱ्यांना त्रास देणारी टोळी सक्रिय असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना देणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकशी करून माहिती देणार
दरम्यान, या प्रकरणाबाबत कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी सध्या संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अवघ्या एका तासात झालेल्या या फेरफार प्रक्रियेचे नेमके कारण काय, नियमांचे पालन झाले का आणि ७/१२ वर नाव नोंदविण्याची प्रक्रिया कोणत्या आधारावर करण्यात आली, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.






