
तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर; विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कल्याण-डोंबिवली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला. विविध ठिकाणी ध्वजारोहण, शहीद स्मारकांना अभिवादन आणि भव्य तिरंगा रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दत्तनगर चौकात उभारण्यात आलेला तब्बल १५० फूट उंच राष्ट्रध्वज या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
महापालिका मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी (थविल) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोंबिवली पूर्वेतील जुन्या विभागीय कार्यालयात उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर कॅ. विनयकुमार सचान स्मारक आणि प्रेरणा वॉर मेमोरियल येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले.
दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने कॅ. विनयकुमार सचान स्मारक ते दत्तनगर चौक अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी व नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रॅलीचा समारोप दत्तनगर चौकात झाला. यावेळी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचे दिमाखात ध्वजारोहण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. विद्यार्थी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसर तिरंगामय झाला होता. दत्तनगरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज आणि भव्य तिरंगा रॅलीने यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष दिमाख प्राप्त झाला.






