घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीचा मुद्देमाल न मिळाल्याचा दावा; १५ ऑगस्टपासून डीसीपी कार्यालयाबाहेर उपोषण
कल्याण : कल्याण पूर्वेतील रहिवासी अमिरी रामनारायण झा यांनी घरफोडीच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत १५ ऑगस्ट २०२६ पासून खडकपाडा येथील पोलीस उपायुक्त (DCP) कार्यालयाबाहेर शांततापूर्ण आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
झा यांच्या म्हणण्यानुसार, ४ जुलै २०२२ रोजी त्यांच्या घरात मोठी चोरी झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात FIR क्र. ०३३९/२०२२, कलम ३८० व ४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घरातून सोने, चांदी तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊनही चोरीला गेलेला मुद्देमाल अद्याप मिळालेला नसल्याचा दावा झा यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या घरात यानंतरही चोरीच्या घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस तपास आणि कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
“गुन्हा दाखल होऊनही चोरीचा मुद्देमाल मिळालेला नाही. संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आमरण उपोषण करणार आहे,” असे झा यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून चोरीचा मुद्देमाल शोधावा, तपासाला गती द्यावी आणि तक्रारदाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. झा यांनी प्रशासनाने दखल न घेतल्यास आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खडकपाडा, कल्याण पश्चिम येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.






