
१४ मजल्यांची परवानगी असताना सात अतिरिक्त मजले उभारल्याचा आरोप; नगरसेवक विकास म्हात्रे आक्रमक
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २२ मधील ‘ओम संप्रीय संकुल’ येथील कथित अनधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘ओंकार रियल्टर्स’कडे केवळ १४ मजल्यांची परवानगी असताना २१ मजली इमारत उभारण्यात आल्याचा आरोप नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केला आहे. १५व्या ते २१व्या मजल्यापर्यंतचे तब्बल सात मजले कोणतीही परवानगी नसताना बांधण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या कथित बांधकामाबाबत महानगरपालिकेच्या नगररचना विभाग तसेच ‘एच/७’ प्रभाग कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित विकासकाला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, तक्रार दाखल होऊन १५ दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित विकासकाकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सुमारे ७ कोटी रुपये थकीत असल्याचा दावाही नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे कथित अनधिकृत बांधकामासोबतच महापालिकेच्या महसुली वसुलीचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
“अनधिकृत बांधकामाला वेळीच आळा घातला नाही तर महापालिकेचे मोठे महसुली नुकसान होऊ शकते. याचा फटका संबंधित इमारतीतील घर खरेदीदार तसेच वित्तीय संस्थांच्या हितालाही बसू शकतो,” असा इशारा विकास म्हात्रे यांनी दिला आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बांधकामास मंजूर आराखड्यानुसार परवानगी आहे की नाही, याची पडताळणी करावी. नियमबाह्य बांधकाम आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता या तक्रारीवर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.






